" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"

Friday, March 14, 2014

किल्ले तुंग अर्थात कठीणगड

रविवार अजून दोन तीन दिवस लांब होता. पण अर्जिता आणि माझ्या मनात सारखा घोळत होता तो "कठीणगड" म्हणजेच किल्ले तुंग. मग काय ? मोहीम करायची तर मावळे नकोत ? सगळ्यांना फोनाफोनी करून शनिवारी रात्री पर्येंत ५ जण तयार झाले. मी, अर्जिता, चिन्मय, मिनाक्षी आणि राकेश.

रविवार सकाळ

सगळे माझ्या घरी जमे पर्येंत ९ वाजून गेले होते. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेचच निघालो. नांदे गावापासून पुढे वर्षानुवर्षे खराब असलेला रस्ता अगदी व्यवस्थित झाल्याचे पाहून बर वाटलं. आणि मनातच म्हटलं कि या निवडणुका दरवर्षी का येत नाहीत ? कारण रस्ता व्यवस्थित होण्यामागचं खरं कारण मला कळलं होतं. पण चांगल्या रस्त्याच्या कृपेने आमचा बराच वेळ वाचला व लवकरच आम्ही कोळवण जवळ पोहचलो. कोळवण जवळच आम्हाला Painted Storks म्हणजेच चित्रबलक या पक्षांची जोडी आकाशात घिरट्या घालताना दिसली.

Painted Stork [ चित्रबलक ]

कोळवण चा चिन्मय विभूती आश्रम ओलांडताच उजवीकडे दिसू लागला किल्ले तिकोना आता त्याची सोबत घेत आम्ही जवण गावी पोहचलो.

कोळवण जवळून दिसणारा तिकोणा
मिनाक्षी आणि राकेश यांना अपरिचीत असणारा तिकोणा त्यांना दुरूनच दाखवला आणि आम्ही डावीकडे तुंग ची वाट धरली. तिकोणा आता मागे पडत चालला होता आणि कठीणगडाचे पवना धरणाच्या जलाशया बरोबरचे दृश्य मनाला भुरळ घालीत होते. त्या दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बाईक बाजूला घेताच होतो कि एक लांब सडक साप रस्ता ओलांडून सळसळत निघून गेला. त्याचबरोबर मनाला जाणीव झाली कि आपण शहरात नाही तर आपण या जीवांच्या हक्काच्या मावळात आहोत.  पुढे वळणावळणांचा रस्ता पार करत थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.

जवण येथून दिसणारा किल्ले तुंग.

समोर आव्हान देत होता कठीणगड चा नावाप्रमाणे कठीण, खडा चढ.

किल्ले तुंग [ समुद्रसपाटीपासून  उंची ३००० फूट] :-
पवना मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोणा, पवना मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास :- या किल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झालं. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मी १६६५ रोजी तुंग आणि तिकोणा या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबाद्खानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. लवकरच हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला आणि ब्रिटीश राजवट येईपर्येंत मराठ्यांच्याच ताब्यात होता.

कोळवण मार्गे पुणे - पवनानगर रस्त्यावर जवण येथे मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळल्यावर तुंगी गावाकडे जाणारा रस्ता लागतो. मोर्वी गाव ओलांडल्यावर पुढे उजवीकडे वळावे, तुंगी गावाच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्यावर जाणारी वाट दाखवणारी पाटी लावली आहे. तुंग किल्ल्याचे दुसरे नाव 'कठीणगड' का ठेवले गेले असावे, हे पायथ्यापासून दिसणारा खडा चढ पाहिल्यावर लगेच ध्यानी येते. किल्ल्याची पायथ्यापासून अदमासे हजार बाराशे फुटांचा उभा चढ आहे.

किल्ले तुंग पायथ्यापासून

  चढावर आधी हनुमानाचे मंदिर आहे.


किल्ल्याच्या वाटेतील हनुमान


पुढे गडाचा प्रथम दरवाजा लागतो. [सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदान करून गडाची डागडुजी तसेच  गडावर येणारी वाट सध्या बरीच सुकर केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार.]

आम्ही किल्ल्याच्या प्रथम दरवाजात
येथून सरळ एक वाट किल्ल्याच्या मावळती कडेच्या बुरुजाकडे जाते.  या बुरुजाकडे सहसा कोणी जात नाही. या वाटेवरून जाताना अतिशय काळजी घ्यावी लागते. वाट वापरत नसल्याने वाटेवर अनेक छोटे दगड आहेत ज्यांच्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते. मी, अर्जिता आणि चिन्मय अतिशय काळजीपूर्वक येथून जात होतो. वाटेचा अवघड भाग नुकताच संपला होता आणि एका दगडात पाय अडकून मी लोटांगण घातलं. माझ्या हनुवटीला आणि खांद्यांना दुखापत झाली. पण नशीब हेच जर मी १०-१५ फूट आधी पडलो असतो तर सरळ हजार फूट खोल दरीत गेलो असतो. नवख्या माणसांनी ह्या बुरुजाकडे जाण्याचे धाडस करू नये. ती वाट अतिशय धोकादायक आहे. मावळती कडच्या बुरुजावरून परत आल्यावर गडाच्या दुसऱ्या दरवाजा कडे वळावं. हा गोमुखी बांधणीचा दरवाजा अधिक भक्कम भासतो. येथून आत आल्यावर आपण गडमाथ्यावर पोहचतो उजवीकडे गणपतीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर सदरेचे अवशेष आहेत. मागे पाण्याचं टाकं आहे मात्र सध्या येथील पाणी पिण्यायोग्य नाही. येथूनच मागे बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे.

माथ्यावरून दिसणारा बालेकिल्ला
बालेकिल्ल्याच्या वाटेवर पहिला टप्प्यावर आलो कि उजवीकडे एक वाट जाते. या वाटेवर पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे. हा किल्ल्यावर स्वच्छ पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. इथे अक्षरशः जमिनीवर झोपून टाक्यातलं पाणी काढावं लागतं. जागा कमी असून सुद्धा पाणी जवळ असल्यामुळे आम्ही येथेच पोटोबा करायला बसलो. आमचं खाणं नुकतंच झालं होतं आणि अजून आमची विश्रांती चालू होती. समोरच्याच दगडावर मला सरडा दिसला होता, मी त्याचे फोटो घेण्यात मग्न होतो.  तितक्यात अर्जिताच्या मागे मला पानांची हालचाल जाणवली म्हणून मी तिकडे पाहिलं तर एक साप अर्जिताच्या बरोबर मागे येऊन थांबला होता.

त्या नंतरचे आमचे संभाषण जसे च्या तसे.

मी : अर्जिता उठ पटकन.
अर्जिता : कशाला ?  आत्ताच बसलेय ना मी.
मी : अर्जिता उठ....
अर्जिता : मी नाही जा.....
मी : अर्जिता तुझ्या मागे साप आहे.

हे ऐकल्या बरोबर आमच्या सौ. दुसऱ्या सेकंदाला पलीकडच्या दगडावर होत्या. आणि सर्प महाशय जवळच्या झाडावर चढले.

हाच तो साप [Buff Strip Keelback, नानेटी]
सकाळपासून दोनदा झालेलं सर्पदर्शन आणि माझं पडणं याचा मानसिक परिणाम या सगळ्यासाठी नवीन असणाऱ्या राकेश आणि मिनाक्षी वर झाला होता. आता ते तिथे क्षणभर सुद्धा थांबायला तयार नव्हते. राकेश तर वरती बालेकिल्ल्यावर सुद्धा यायला तयार नव्हता. पण आम्ही जबरदस्ती त्याला वरती घेऊन गेलो. हा गडाचा सर्वोच्च बिंदू आहे. गडमाथा छोटा असल्यामुळे तासा दीड तासात सर्व गड पाहून होतो. इथून गडाला तिन्ही बाजूने वेढणारा पवना जलाशय, लोहगड, विसापूर, तिकोणा सहज दिसतात. आणि हवामान चांगलं असेल तर नैऋत्य दिशेस जांभुळी डोंगर रांगेच्या पलीकडे कोरीगडाचा माथा दृष्टीस पडतो. वरून दिसणारी दृश्य मनात साठवून आम्ही आता परतीच्या वाटेवर लागलो.

वाटेत दिसणारा तिकोणा जणू काही मला म्हणत होता " आता मला कधी भेटायला येणार ? "
"लवकरच " असं मनातल्या मनात त्याच्याशी बोलून मी त्याचाही निरोप घेतला.

4 comments:

  1. Wow.....
    Masta lihilayas description. :) :)
    Pudhil lekhanas shubhechha...

    ReplyDelete
  2. Nice description n snaps as well! keep it up!

    ReplyDelete
  3. Thanks all...
    more updates coming soon... dont forget to subscribe

    ReplyDelete