" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"

Monday, June 23, 2014

लोणारची अद्भुत दुनिया [भाग १]

अवनी मंडले पुण्यं जंबुद्वीपं युधिष्ठीर | जंबुद्वीपात्पुण्यतमं भारतं दंडकं तत: ||
दंडकात्परमं परम क्षेत्रं विरजम् पितृवत्सलम् | विरजा पुण्यतमं क्षेत्रं कलौ मातृगृहम् स्फुटम् ||
 

बरेच दिवसांपासून शेगांवला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचं मनात होतं, चिन्मयभाऊ बरोबर होतेच. आता इतक्या लांब जात आहोत तर जवळपास आणखी काही ठिकाणे आहेत का ? याचा शोध घेऊ लागलो. आणि आम्हाला सापडलं ते घाणेकरांच्या भाषेतलं नवलतीर्थ "लोणार". 

झालं Plan ठरला.... संध्याकाळच्या बस ने शेगांव ला जायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी लोणार बघून परत शेगांव ला येऊन रात्रीच्या बस ने पुण्याला यायचं. 

ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी शेगांव ला पोहचलो. मंदिरा जवळच एका हॉटेल मध्ये रूम घेतली. [ इथे भक्तनिवास आहे. पण आम्ही मित्र मित्र गेलो होतो म्हणून आम्हाला खोली मिळाली नाही. सह कुटुंब गेल्यासच तेथे खोली मिळते] आंघोळ वगैरे आटोपून महाराजांच्या दर्शनाला गेलो. फारशी गर्दी नसल्याने पटकन दर्शन झालं. नंतर आमचा शोध सुरु झाला तो शेगांव च्या कचोरी साठी. "ती" सुप्रसिद्ध ओरिजिनल कचोरी नक्की कुठली ते मात्र दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी १०-१५ कचोरी खाऊन सुद्धा आम्हाला कळालं नाही. दुसरा दिवस उजाडला. आम्ही मात्र उशिरा उठलो. आणि आपल्याला प्रचंड उशीर झाला आहे हे कळताच गडबडीने आवरून आम्ही ST stand गाठलं. Direct लोणार ला जाणारी बस केव्हांच गेली होती. मग काय ? खामगांव, मेहकर अश्या मजला मारत आम्ही लोणार ला येऊन पोहचलो. एव्हाना १२ वाजून गेले होते. आणि आम्हांला पुण्यासाठी ९.३० ची गाडी शेगांव वरून पकडायची होती. त्यामुळे आमच्याकडे ७ पर्येंत वेळ होता.   

लोणार...


तुम्ही म्हणाल कुठे सह्याद्री आणि कुठे लोणार ? हो.. खरंतर या ठिकाणाचा आणि सह्याद्रीचा भौगोलिक दृष्टया काहीही संबंध नाही. मात्र ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टया खुप जवळचा संबंध आहे. आणि म्हणूनच तर आम्ही इथे आलो होतो.

लोणार नगराचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. त्यातील मधुमता नावाचे नगर म्हणजेच लोणार आहे. इथे असलेल्या भोगावती कुंडात श्री रामाने स्नान केले आहे तसेच रामकुंडावर दशरथाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात राजा युधिष्ठीराने येथे वडिलांचे श्राद्ध केले. 

सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याच्या मार्गावर हे महत्वाचे स्थळ होते. त्यामुळे यास दक्षिणद्वार म्हटले गेले आहे. वाकाटक राजांच्या काळात येथील धारे जवळचे सूर्यमंदिर [देवी मंदिर], नृसिंह मंदिर, धारेचा घाट इत्यादी तयार झाले. सातवाहन राजांच्या काळातही लोणारला महत्व होते. राष्ट्रकुट राजांच्या काळात सितान्हाणी समोरचे कुमारेश्वर मंदिर तयार झाले. चालुक्य व होयसाळ यांचेही हे ठाणे होते. उत्तर चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी प्रसिद्ध दैत्यसूदन मंदिर ११ व्या शतकात बांधले. तर होयसाळ राजांनी पापहरेश्वर मंदिर बांधले. कमळजा देवीचे मंदिरही साधारण याच काळात बांधले गेले.
यादवांच्या काळात वरील मंदिरांची डागडुजी व विवरातील शिवमंदिरे बांधली गेली. अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणानंतर अनेक शतके लोणारचा इतिहास अंधारात राहिला.

लोणार ST stand वरून चालतंच आम्ही पोहचलो ते प्रसिद्ध (?) दैत्यसूदन मंदिरात.

दैत्यसूदन मंदिर.

१८७८ सालापर्येंत हे मंदिर अज्ञात होते. इथे फक्त एक मातीची टेकडी होती. १८७८ साली येथे उत्खनन झाल्यानंतर मंदिराचा शोध लागला. वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर उत्तराभिमुख असून त्याचा आकार ताऱ्यासारखा आहे. ह्याचा निर्मिती काल निश्चितपणे १२४१ पूर्वीचा आहे. नवीन संशोधनानुसार हे मंदिर उत्तर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा म्हणजे विजयादित्य याने त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव त्रिभुवनकीर्ती नावाच्या शिल्पज्ञाच्या आराखड्यानुसार बांधले आहे.




दैत्यसूदन मंदिर






   हे मंदिर पाहताक्षणीच मला नृसिंहवाडी जवळ असलेल्या खिद्रापूरच्या मंदिराची आठवण झाली.

खिद्रापूरच्या मंदिराप्रमाणेच हे मंदिर देखील त्रिस्तरीय प्रकारचे आहे. गर्भगृहात विष्णूची मूर्ती आहे. त्यांच्या पायाखाली लावणासूर हात जोडून मोक्ष मागत आहे.

विष्णू मूर्ती - दैत्यसूदन मंदिर

हि मूर्ती मूळची नाही मंदिराचा शोध लागला तेव्हा गाभाऱ्यात मूर्ती नव्हती. [बहुदा अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणावेळी ती नष्ट झाली असावी अथवा लुटून नेली असावी] नंतर नागपूरकर भोसले यांनी स्वामी सच्चीताश्रम यांच्या सल्ल्यानुसार सध्याची मूर्ती बनविली. हि मूर्ती सुद्धा निजामाच्या काळात भग्न झालेली आहे. नंतरच्या काळात देवाच्या डोळ्यातील मौल्यवान रत्ने सुद्धा चोरीला गेली.

गर्भगृहाच्या वरच्या बाजूस  गंधर्वयुग्म आकाश मार्गे चर्चा करीत जात आहेत. अप्सरा नृत्य करीत आहेत अशी शिल्पे आहेत. अंतराळगृहात छतावर लावणासूर वध कथा, गंगाभोगावती चे शिल्प आहे. लावणासूर वध शिल्पात लावतासूर हात जोडत आहे आणि त्याच्या पोटावर पाय देऊन विष्णू रागाने पहात आहे.

अंतराळगृहाच्या पुढे मोठे सभागृह आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर शिल्पे आहेत. मुख्य मंडपाच्या व्हरांड्या खालच्या दुसऱ्या पायरीवर " शके ११६३ कान्हेदेव मंदिरास आले" असा शिलालेख आहे.


मंदिराची जोती सहा स्तरीय आहेत. पहिले दोन स्तर शुभ रांगोळी सारखे आहेत, तिसऱ्या स्तरावर गोपद्मे आहेत, चौथा स्तर हंसपट्टीचा आहे. पाचव्या स्तरावर कमल कलिका आहेत तर सहावा स्तर कीर्तीमुखांचा आहे


पूर्वी हे मंदिर साधारण ५६ फूट उंचीचे असावे. बाहेरील बाजूस काही शिल्पे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. ती पुढीलप्रमाणे.

१. नागराज मैथुन २. वराह ३. मैथुन शिल्पे ४. शीवायनी शिल्प ५. नैऋत्य राक्षस शिल्प

राधा कृष्ण
 ६. राधा कृष्ण शिल्प 

७. मैथुन शिल्प ८. शिपाई ९. देवकी वासुदेव व पहारेकरी शिल्प १०. विष्णू ११. आदित्य नारायण १२. कुत्र्यासह भैरव व वैलीवेष्टित मैथुन शिल्प

चामुंडा देवी शिल्प


१३. [कोनाड्यात] चामुंडा देवी शिल्प 

१४. धनुष्य व परशु धारक परशुराम १५. तंतुवाद्य वादिनी १६. शंकर - गळ्यात मुंडमाळ [अंधासूर वध कथा]

दर्पण सुंदरी
१७. दर्पण सुंदरी 

१८. विषकन्या १९ ब्रम्हचारी

इराणचा सूर्य
 २०. [मागील कोनाड्यात] सूर्य या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे इराण मध्ये बनवले गेले होते. या सूर्याच्या पायात बूट आहेत. व एका हातात कमलपुष्प व दुसऱ्या हातात राजदंड आहे. पायाशी अंधार दूर करण्या करिता उषा आणि प्रत्युषा बाण मारीत आहेत. भारतीय सूर्याच्या पायात पादत्राणे नसतात तसेच दोन्ही हातात कमल अथवा कमल कलिका असतात. हे शिल्प म्हणजे इराणचा तत्कालीन राजा खुश्रो आणि विजयादित्य यांच्या व्यापार आणि मैत्रीचे प्रतिक आहे.

२१. सूर्यनमस्कार घालणारा ब्रम्हचारी २२. वाद्य वादिनी २३. ब्रम्हा विष्णू महेश

नृसिंह
२४. [कोनाड्यात] नृसिंह

 २५. द्वारपालिका हातात चाकू सारखे हत्यार २६.शेषासह विष्णू २७. मातृशिल्प

द्वारपाल पट्टीका
२८. द्वारपाल पट्टीका

२९. सवाद्य नृत्य ३०. युद्ध - भारतीय व इराणी योद्धा ३१. वामन अवतार

रेवती बलराम कृतीका
 ३२.रेवती बलराम कृतीका

३३. गंगादेवी

महिषासुरमर्दिनी
३४. महिषासुरमर्दिनी

 ३५. राम लक्ष्मण सीता ३६. लक्ष्मी नारायण ३७. द्वारपाल ३८. मुष्टियुद्ध ३९. बलराम शिल्प.

इतर काही प्रकाशचित्रे...






मंदिराची सद्यस्थिती

१. सरोवराच्या खाऱ्या पाण्यामुळे मंदिर शिल्पांना नुकसान होत होते. म्हणून अलीकडेच शिल्पांवर पॉलीथीनचे अच्छादन केले गेले आहे, पण
२. मंदिर परिसर अतिशय अस्वच्छ आहे. [स्वच्छतेसाठी प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे]
३. आजूबाजूला बरीच मुसलमान वस्ती आहे, तेथील लोक शौचास म्हणून मंदिराच्या आवारात येतात. [हा प्रकार चीड आणणारा आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने असे प्रकार थांबवावेत.]
४. मंदिराकडे जाण्याची वाट शोधत गल्लीबोळातून जावे लागते, [गैरसोय टाळण्यासाठी मार्गदर्शक फलक लावणे गरजेचे आहे.]

मंदिर शिल्पांचे निरीक्षण करून आम्ही त्या विख्यात, जगात एकमेव अश्या असलेल्या सरोवराकडे निघालो.

क्रमशः [भाग २ मध्ये]

संदर्भग्रंथ : लोणार दर्शन - विज्ञान, कला-पुराण व इतिहास - प्रा. सुधाकर बुगदाणे 

1 comment: