" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"
Showing posts with label मढेघाट. Show all posts
Showing posts with label मढेघाट. Show all posts

Thursday, March 13, 2014

मढेघाट, भोर आणि मटण मसाला वाली भेळ. (गुंजवणे मावळ रॉक्स)

( काही कारणामुळे या पोस्ट मध्ये फोटो टाकू शकत नाहीये पुढच्या पोस्ट शक्यतो फोटोसह असतील )

शनिवारी संध्याकाळी

चिन्मय घरी आलेला बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही काहीतरी हादडायला बाहेर पडलो . तेव्हा पाणीपुरी खाताना चिन्मय म्हणाला चल  उद्या कुठेतरी भटकायला जाऊया. पण माझा काही केल्या मूड होत नव्हता. तो चल  म्हणून मागे लागलेला. पण शेवटी नाही नाही म्हणून त्याला गप्प बसवण्यात मी यश मिळवलं. पोटोबा झाल्यावर तो घरी गेला आणि मी सुद्धा घरी येउन निद्रादेवीच्या अधीन झालो.

रविवार सकाळ.

          ऑफिस ला जायचं  tension नसल्यामुळे निवांत ९.३० ला उठलो. जाग आल्या आल्याच काय झालं माहिती नाही, पण अंथरुणातून उठायच्या आधीच चिन्मय ला फोन लावला पठ्ठ्या अजून झोपेतच होता, त्याला म्हणालो कुठे जायचं  असेल तर १०.३० पर्येंत घरी ये. साहेब ११.३० ला घरी आले.आम्ही लगेच निघालो डोक्यात होता मढेघाट आणि सिंहगड तोरणा आणि राजगड सारख्या किल्ल्यांचं जवळून  दर्शन. खडकवासल्यापासून पुढे सिंहगड ढगांमध्ये लपंडाव खेळत होता. आणि त्याच्यावरचे towers तर पूर्णवेळ गायबच होते. त्यामुळे आम्हाला without  towers सिंहगड पाहायला मिळाला. सिंहगडाचं असं  दर्शन देणाऱ्या त्या  ढगांना धन्यवाद देत आम्ही पुढे निघालो.  खानापूर पासून डावीकडे आमची स्वारी पाबे घाटाकडे वळली. सिंहगडाला वळसा घालत आम्ही पुढे जात होतो. इथे पावसाची अपेक्षा होती पण आमचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. पण घाट संपून पुढे आम्ही वेल्ह्याकडे वळणार तोच जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं. आणि त्या वरुणराजानं आमचं तोरण्याचं दृश्य हिरावून घेतलं. पुढे गुंजवणे धरणाला बगल देत आम्ही पुढे गेलो आणि दाट ढगांनी आमचं स्वागत केलं. राजगड सुद्धा तोरण्यासारखाच ढगांत हरवला होता. पुढे पासली गावाजवळ दिशादर्शक फलक होता त्यावर लिहिले होते " <--- भोर ६० "  "इकडून भोर ला जायला रस्ता आहे ?" चिन्मय आणि माझ्या तोंडून एकाच वेळेला प्रश्न बाहेर पडला. तिकडे जाणारा रस्ता पहिला तर अगदी छोटासा आणि झाडीत लपलेला असा होता. पण आमच्या डोळ्यापुढे सध्या मढे  घाट  असल्यामुळे आम्ही पुढे निघालो. मढे  घाट जिथून  खाली उतरतो त्या जागेच्या थोडे अलीकडेच bike लावली कारण पुढे चिखलाने रस्ता खूपच खराब झालेला. पुढे चालत कड्याकडे निघालो . जाताना जागोजागी चालू असलेल्या दारू पार्ट्या बघून खूप वाईट वाटलं. आपल्या स्वराज्याच्या शिलेदारांचा राबता असलेला मढे घाट. तानाजी मालुसरेंच्या मृत्यु नंतर त्यांना ज्या वाटेने त्यांच्या उमरठे गावी नेण्यात आले ती हि वाट. अश्या जागी दारूच्या पार्ट्या आणि हिडीस कृत्ये करताना ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ? अर्थात इतिहासाशी देणं घेणं नसलेल्या आजच्या पिढीला अश्या जागांच महत्व आणि पावित्र्य समजतंच नसेल तर काय बोलणार ? पण ह्या तळीरामांचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा.  आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करत कड्यावर जाऊन पोहचलो . खालच्या खोऱ्यातला  उदंड मुलुख नजरेत भरत होता पलीकडे वरंध घाटाचे डोंगर दिसत होते.  समोरच्या मुलुखाचे निरीक्षण करताना मनात विचार येत होते.  या डोंगरांच्या पलीकडेच मालुसरेंचे उमरठे. समोरच्या डोंगरांच्या कुशीतच कुठेतरी समर्थांची शिवथर घळ. आणि वरंध घाटाचा संरक्षक दुर्ग कावळ्या किल्ला. माझी नजर या सगळ्याच्या खाणाखुणा शोधत होती तेवढ्यात ढगांनी समोरच्या दृश्यावर पडदा टाकला आणि अवती भोवती एकच धवल रंग दिसू लागला. मागे पहिले तर मागचे तळीराम पण ढगात गायब झालेले. तिथल्या अप्रतिम निसर्गाचा, पावसाचा आणि ढगांचा आनंद घेऊन आम्ही परत फिरलो जाताना डावीकडे एका पडक्या घरातून आवाज आला " ओ चा पायजे का ? " बघितला तर साधारण १०-१२ वर्षाची मुले चहा विकत होती. इतक्या थंडी आणि पावसात कोणी चहा पाहिजे का विचारतंय, कोण नाही म्हणेल ? आणि तसं  पण म्हणतात ना कि " सावाशिनीनं कुकवाला आनं मर्दानं च्या ला नाय म्हनायचं नसतं" आम्ही चहा घेतला. शाळेला रविवार ची सुट्टी म्हणून सुट्टीच्या दिवशी चहा विकून चार पैकं मिळवणाऱ्या त्या पोरांचं कौतुक वाटलं.  चहा घेऊन बाईक काढली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

           "भोर ६० -->" पुन्हा बोर्ड दिसला. चिन्मय ला विचारलं जायचं का ? चिन्मय confused. मी म्हणालो toss  करूया. त्यावर चिन्मय "toss केला तरी आपण जायचं तिकडेच जाणार" चिन्मयचं हे वाक्य ऐकताच toss चा विचार cancel करून आम्ही भोर कडे जाणाऱ्या  चिंचोळ्या रस्त्यावर वळलो.  तिकडे वळून थोडाच वेळ झाला आणि चिन्मय म्हणाला आदित्य भूक लागलीय. आणि माझ्या लक्षात आलं  कि मला पण भूक लागलीय. पण त्या रस्त्यावर जिथे माणूस सुद्धा मोठ्या मुश्किलीने दिसत होता इथे कसलं दुकान आणि कसलं  हॉटेल ? मी चिन्मय ला म्हणालो भोर मध्ये गेल्यावर खाऊ काहीतरी. अंदाज होता तासाभरात भोर ला पोहचू. पण पुढे डांबरी रस्ता संपला आणि फक्त दगड गोट्यांचा रस्ता राहिला साहजिकच बाईक ची गती मंदावली. पुढे जवळपास ३० कि मी रस्ता असाच होता आणि ते अंतर पार करायला आम्हाला जवळपास ४ तास लागले. पुढे चांगला रस्ता चालू झाला आणि तितक्यात आम्हाला एक टपरी दिसली शेजारी एका फळकुटावर लिहिले होते "चहा भेळ  बुर्जी मिळेल" हे वाचून सकाळपासून भुकेलेला आणि गेले ५-६ तास पावसात भिजत असलेला कोण शहाणा थांबणार नाही ? बाईक आपसूकच थांबली. आणि आमचा भ्रम दूर झाला कारण ती टपरी नव्हती ते तिथले एक सुपर मार्केट होते. प्रत्येक गोष्ट त्या दुकानात उपलब्ध होती. आणि दुकानदार शिकलेला तर होताच वर त्याने cooking apron घातलेला पाहून surprised  झालो. भेळ  आमच्या प्रचंड आवडीचा विषय असल्याने त्याला विचारले भेळ आहे का ? तो म्हणाला "आहे पण बिन चिरमुऱ्याची आहे." आम्ही विचारले म्हणजे काय प्रकार आहे ? तो म्हणाला "हि मी बनवलेली रेसिपी आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मग पैसे द्या. १४ दिवस वेगवेगळे  प्रयोग करून हि रेसिपी बनवलेली आहे." आम्ही खाऊन  तर बघु  म्हणून दोन भेळ  द्यायला सांगितल्या. भेळेत त्याने फरसाण, मक्याचा चिवडा, कांदा, मिरची या बरोबर मटण  मसाला आणि tomato  sauce  घातला. हे आमच्यासाठी आणखी एक surprise  होतं. भेळ तयार करताना तो म्हणाला कि माझी हि रेसिपी इंटरनेट वर सुद्धा उपलब्ध आहे. माझ्या मित्रांनी  टाकलीय (त्याने जी website रेसिपी साठी सांगितलेली ती काही मिळाली नाही मिळाल्यास नक्की देईन) नंतर आणखी एक भेळ खाऊन, आणि काही गप्पा गोष्टी नंतर त्या खुळे  आडनावाच्या शहाण्या माणसाचा निरोप घेऊन आम्ही भोर कडे निघालो. लवकरच आम्ही भोर कापूरहोळ रस्त्याला लागलो. आमच्या बाईक चा इतका वेळ असलेला ताशी १० कि मी चा जास्तीत जास्त वेग ७० पर्येंत गेला. दीड तासात घरी पोहचून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो ……. 

नित्य नूतन हिंडावे

नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे ।

ज्यांच्या पायी माझी उदंड भक्ती जडलेली आहे. अश्या रामदास स्वामींचे हे सांगणे मी आणि माझ्या माहितीतली इतर टाळकी अतिशय भक्तिभावाने पाळतो. भटकणे आमचा छंद आहे, आमचा धर्म आहे, आमची नशा आहे. खास करून जिथे फार कोणी जात नाही अश्या ठिकाणी आम्ही मात्र हमखास जातो. बरेचवेळा त्यासाठी कसलंही planning नसतं. काल असेच येड्यासारखे भटकून आलो. येताना एक वेगळीच भेळ अनपेक्षित ठिकाणी खायला मिळाली. दिवसभराचा experience सॉलिड होताच. त्यामुळे विचार आला कि आपण जगावेगळे अनुभव तर घेतंच आहोत तर हे अनुभव इतरांबरोबर share करायला काय हरकत आहे ? लगेच हा विचार मी चिन्मय (ह्या प्राण्याशी नंतर ओळख होईलच) ला बोलून दाखवला. झालं लगेच ठरलं ब्लॉग चालू करायचा. तर अशी हि या ब्लॉग  च्या जन्माची कहाणी. इतर भटकंतीच्या गोष्टी तुमच्यासमोर वेळोवेळी सादर होत राहतीलच. 

(कालची स्टोरी लवकरच पोस्ट करतोय)

धन्यवाद ….