" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"
Showing posts with label Sahyadri. Show all posts
Showing posts with label Sahyadri. Show all posts

Wednesday, December 21, 2016

पाषाणपुष्प - कमळगड

            "कमळगड लवकरच" - बरेच दिवस भ्रमणमंडळाच्या Whatsapp Group चा हाच Subject  होता.


            शेवटी मुहूर्त लागला आणि जायचा दिवस उजाडला. हो नाही करत करत ७ वीर या मोहिमेसाठी तयार झाले. पैकी मी, प्रद्युम्न, सुहास, मकरंद, सायली गाडीतून आणि चिन्मय, नेहा Bike वरून येणार असं ठरलं . सकाळी लवकर निघून पायथ्याशी  असलेल्या तुपेवाडी जवळ राहणाऱ्या विष्णूबुवां कडं जेवायचं, मग तासभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु करायचं असं ठरलं होतं. पण नेमकी सकाळी काही कामं लागल्यामुळं मलाच आवरायला उशीर झाला. चिन्मय आणि नेहा तर केंव्हाच पुढे निघून गेले होते. (त्यामुळे नंतर त्यांना वाई मध्ये आमची वाट बघत बसावं लागलं. बिचाऱ्या चिन्मयची तर खूप चीडचीड झाली :D  :D )


            संध्याकाळी ४.३० ला आम्ही विष्णूबुवांकडे पोहोचलो. खूपच उशीर झालेला होता. जेवण करून निघे पर्येंत ६ वाजून गेले होते. आम्ही गाडी गडाच्या पायथ्याशी जिथेपर्येंत रस्ता जातो तिथे पर्येंत नेली. आपापल्या Bags घेऊन चालायला सुरु करणार तोच, माझा Camera विष्णूबुवांच्या घरी राहिल्याचं लक्षात आलं . बाकी सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून मी आणि प्रद्युम्न परत जाऊन Camera घेऊन आलो, आणि गड चढायला सुरुवात केली. या सगळ्यात आणखी अर्धा तास मोडला.


कमळगड [समुद्रसपाटी पासून उंची ४२०० फूट] - वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायरेश्वर, केंजळगड अश्या सर्व ठिकाणां  वरून धोम धरणाच्या पाण्यामध्ये दिसणारे हे पाषाणपुष्प, कमळगड म्हणून प्रचलित आहे. हा किल्ला पूर्वी  भेळंजा आणि कत्तलगड या नावांनी सुद्धा ओळखला जात असे. या गडाचा निर्माता अज्ञात आहे. विजापूर च्या मोकासदाराच्या अंमलाखालील हा गड आजूबाजूच्या केंजळगड, पांडवगड, वैराटगड यांच्या बरोबरीनेच मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. नंतर एप्रिल १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या Maj. Thatcher ने हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटीश सरकारच्या काळात या किल्ल्यावर युद्धबंद्यांना मृत्यूदंड दिला जात असे. गेरूची (काव) विहीर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. या विहिरी व्यतिरिक्त इथे काही नाही असा समज आहे, पण आमच्या आत्तापर्येंतच्या दोन भेटीत आम्हाला बालेकिल्ल्यावर गवतात लपलेला तटबंदीचा पाया आणि बालेकिल्ल्याच्या वाटेवर बुरुज सदृश बांधकामाचे अवशेष आढळले आहेत.


विष्णुबुवा पुढे आणि आम्ही मागे मागे अशी गड चढायला सुरुवात केली.

            चढाईला सुरुवात  करून १५ मिनिटं पण झाली नाहीत तोपर्येंत मंडळी गळपाटली पण थोडा वेळ थांबत थोडा वेळ चढत आम्ही चढाई सुरु ठेवली. हळू हळू अंधारून यायला सुरु झालं होतं. जस जसा अंधार वाढू लागला आमच्या बरोबरची नवखी मंडळी थोडी घाबरू लागली. त्यात आम्ही तिघे तर बरेच पुढे गेलो, पण इतर चार जण मात्र बरेच मागे पडले. आधीच अंधार पडलेला, त्यात ते दिसेनासे झाले. म्हणून आम्ही होतो तिथेच थांबून त्यांना हाका मारत होतो. त्यांचं फक्त आलो आलो २ मिनिटं ५ मिनिटं ईतकच प्रत्युत्तर येत होतं. बऱ्याच वेळाने ते आले, तेव्हा कळलं प्रद्युम्न "डबा टाकायला" गेला होता, आणि पठ्ठ्या निवांत सगळा प्रोग्राम आवरून आला होता.

 तो आल्यावर परत चढायला सुरुवात केली. एव्हाना आम्ही बरेच वर आलो होतो. गडाच्या कमळ माचीच्या आधी बऱ्यापैकी सपाट टप्पा लागतो. तिथे पोहोचल्यावर आम्ही घटकाभर विश्रांती घेतली. त्या टप्प्यावरून एका बाजूला खालच्या वासोळे गावातले दिवे चमकत होते. तर दुसऱ्या बाजूला दूरवर महाबळेश्वर दिसत होते. दुरूनच त्या बलशाली महाबळेश्वराला वंदन करून सर्वांनी ॐकाराचा जप केला. केलेला ॐकार, महाबळेश्वरावरून येणारी थंडगार हवा, आणि फलाहार यामुळे पुन्हा ताजे तवाने होऊन "हर हर महादेव" चा घोष करत आम्ही पुनश्च चढाई सुरु केली. आणि १५-२० मिनिटांतच  गडाच्या माचीच्या एका टोकाशी असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिरात पोहोचलो.

           
वरती पोहोचल्यावर नाथांना मनोभावे नमस्कार करून काही वेळ तिथेच बसून पुन्हा ॐकार केला. आणि मंदिराच्या बाजूच्या खोलीत आलो. हीच तर होती आमच्या मुक्कामाची जागा. ह्या खोलीत नाथांच्या धुनीचे कुंड आहे, आम्ही पहिलं काम काय केलं असेल, तर हि धुनी प्रज्वलित करण्याच्या उद्योगाला लागलो. धुनी प्रज्वलित झाल्यावर….… मग काय ? विठोबा झाला, आता पोटोबा…. मंदिराच्या बाहेर बसुन सगळ्यांनी मेथीच्या ठेपल्यांवर ताव मारला . पोटोबा झाल्यावर शेंगा खात खात आम्ही स्मरणशक्तीचे खेळ खेळायला सुरुवात केली. तासभर खेळून झाल्यावर आम्ही आत जाऊन निद्रादेवी ला शरण गेलो.

            सकाळी मला लवकरच जाग आली, पाहिलं तर सगळे अजून साखर झोपेत होते, मी उठून मंदिराच्या बाहेर फेरफटका मारायला गेलो. समोर महाबळेश्वरावर मस्त ढग उतरले होते. मागच्या बाजूचा केंजळगड पण अदृश्य झालेला होता. पण अशी काही थंडी होती कि जास्त वेळ हिंडताच येईना, म्हणून परत खोलीत आलो. तोपर्यंत काही मावळे उठलेले होते, बाकीच्यांना अर्थातच मागं लागून उठवावं लागलं. सकाळी आवरून झाल्यानंतर, रात्री गड चढताना सुहासने पकडलेल्या काजव्याला सोडून दिलं आणि वरती निघालो, पण परत थांबलो.……….


             का थांबलो ? अहो अजून महत्वाचे काम राहिले होते ना. आम्ही मावळ्यांनी एवढा मोठा गड सर केला भगवा कोण लावणार ? लगेचच कमानी शेजारची जुनी ध्वजाची काठी उतरवली जुना फाटका ध्वज काढला, त्याजागी नवा कोरा ध्वज लावून काठी पुन्हा उभी केली. ध्वजाला वंदन केलं आणि मगच बालेकिल्ल्याकडे जायला निघालो.









        

          बालेकिल्ल्यावर जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो आणि काही वेळाने मोकळा भाग व एक मोठे घर दिसते, इथे धनगराचे एक कुटुंब राहते. या मोकळ्या भागातून पुढे जाताना उजवीकडे बालेकिल्ला दिसत असतो.


             इथले धनगराचे घर हे संपूर्ण गडावर हे एकमेव घर आहे. त्यांच्याकडे चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. इथून पुढच्या वाटेवर डावीकडे झाडीत पडक्या बुरुजा सदृश अवशेष दिसतात. तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळातून वर जाणारा एक रस्ता दिसतो. इथे पूर्वी वर जायला व्यवस्थीत रस्ता असावा हे आजूबाजूच्या तुटक्या फुटक्या पायऱ्या बघितल्यावर लगेचंच लक्षात येतं. बहुदा हे तोडफोडीचे काम Maj. Thatcher नेच केलं असावं. १८१८ मध्ये मराठ्यांचे जवळपास सगळे किल्ले जिंकल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर होऊ  नये म्हणून ब्रिटिशांनी या किल्ल्यांचे मार्ग उध्वस्त करून टाकले होते. त्यालाच हा कमळगड सुद्धा बळी पडला असावा. तुटलेल्या पायऱ्यांमुळे इथे थोडसं प्रस्तरारोहण करुनंच वर यावं लागतं.

           
             वर येताच अष्टदिशांचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. समोर महाबळेश्वर, डावीकडे पाचगणीचं Table Land , उजवीकडे केंजळगड व रायरेश्वर आणि पाठीमागे धोम धरणाचा अथांग जलाशय आणि त्याच्या पलीकडे दिसणारा पांडवगड.






           

          याच बालेकिल्ल्यावर आहे प्रसिद्ध गेरू, म्हणजेच कावेची विहीर. कावेच्या विहिरीत नंतर उतरायचे ठरवून आम्ही समोरच्या टोकाकडे जायला निघालो. इथे असलेला ध्वज सुद्धा फाटलेला होता. आम्ही असताना तो फाटलेला ध्वज तसाच कसा राहील ? लगेच नवीन ध्वज Bag मधून बाहेर आला आणि काही वेळातच "हर हर महादेव" "जय भवानी - जय शिवाजी" च्या गजरात त्या खोर्‍याच्या सर्वोच्च बिंदूवर भगवा डौलाने फडकू लागला.




            तो भगवा पाहता पाहताच ऊर आणि डोळेसुद्धा भरून आले. हा भगवा असाच डौलाने फडकत रहावा म्हणून अगदी याच्या निर्मिती पासून याच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी लढणाऱ्या आणि प्रसंगी जीव देणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन केले. तिथली माती मस्तकी लावली आणि शपथ घेतली की इथून पुढे ज्या गड, किल्ले वा मंदिरांना भेट देऊ तिथला ध्वज जर खराब झाला असेल तर तिथे नवीन ध्वज लावू.









      
           नंतर आम्ही परत कावेच्या विहिरीकडे वळलो. जमिनीच्या पोटात खोल खोल जाणाऱ्या कावेच्या विहिरीत उतरणे हा अनुभव थरारक आहे. आपण जसजसे खाली उतरत जातो तसा तसा हवेतला गारवा वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला आपल्याला लाल काव दिसते. तिथे असताना सहजच मनात विचार आला. शिवराज्याभिषेकावेळी रायगडावर रंगरंगोटी करायला इथली काव नेली असेल का ? कुणाला माहिती ? कदाचित नेली सुद्धा असेल. ईतिहास सगळ्या गोष्टी सांगत नाही. इतक्या detail मध्ये तर नाहीच नाही.


            या कावेच्या विहिरीमधून बाहेर येउन आम्ही पुन्हा एकदा सर्व मुलुखावर नजर टाकली आणि बालेकिल्ल्यावरून खाली आलो. परत धनगराच्या घरी येउन त्यांनी केलेला मसाले भात खाल्ला आणि त्यांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. तिथून निघतानाच आणखी ३ जण तिथे आले, ते म्हणाले आम्ही रस्ता चुकलेलो फार काट्याकुट्यातून आलो. त्यांनी पुढे बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता विचारला. त्यांना रस्ता सांगून आम्ही पुढे निघालो.


            परताना आमची नजर वळून वळून पुन्हा त्या भगव्या कडेच जात होती.





            जाता जाता आम्हाला अजून एक काम करायचं होतं. ते म्हणजे गडावर जाण्याचा रस्ता दाखवणाऱ्या खुणा करणे. इथे जंगल झाडी खूप आहे, मागच्या वेळी आम्ही सुद्धा रस्ता चुकलो होतो. यावेळी आम्ही बरोबर आलो पण मगाशी वर भेटलेल्यांनी रस्ता चुकल्याचं सांगितलं. तसंच उतरताना आणखी एक ग्रुप भेटला, त्यांनी सुद्धा आम्हाला रस्ता विचारला. ते बिचारे पण खूप लांबून आले होते. ही दोन उदाहरणं तिथेच मिळाल्यामूळे आम्हाला खात्री झाली की  आम्ही करत असलेल्या या "मार्ग"दर्शनाचा आमच्या सारख्या भटक्यांना नक्कीच उपयोग होणार.  










          गड उतरत बरेच खाली आल्यावर वाटेत हे महाशय चिन्मय ला दिसले. आणि परत  एकदा जाणीव झाली की आम्ही त्यांच्याच राज्यात आहोत. मित्रांनो यांच्या राज्यात हिंडताना खूप सावध रहा. यांच्याशी मस्ती करायला तर बिलकुल जाऊ नका. अश्या ठिकाणी या छोट्याश्या विंचवाचा दंश सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. 



मित्रांनो कसा वाटला कमळगड ? जरूर सांगा… 
तुम्ही जर कमळगडावर गेलात तर जाताना आम्ही केलेल्या मार्गदर्शक खुणा कितपत उपयुक्त आहेत ते जरूर कळवा. तुमच्या आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे. 



महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||
शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||




धन्यवाद !!!